ब्लॉग 0 Comments 229 Likes       24 Mar 2018

जे पेरलं तेच उगवणार !

सोशल मीडियावर दिवसाची सुरुवात व्हाट्स अँप आणि फेसबुकपासून होते, हे दोन्ही अँप फ्री असल्यामुळे त्याचे सर्व देशात करोडो युझर आहेत. भारतात फेसबुकचे २० कोटी सदस्य आहेत , व्हाट्स अँपचे त्यापेक्षा दुप्पट आहेत. पण फ्री असलेले हे अँप आता लोकांचा वैयक्तिक डाटा चोरून करोडो रुपयाचा फायदा उचलत आहेत, यामुळेच 'फेसबुक' सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली आहे. केम्ब्रिज अॅनॅलिटिकाने फेसबुकच्या जवळपास 5 कोटी युजर्सचा डेटा एका अॅपच्या माध्यमातून मिळवला. या डेटाचा वापर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या फायद्यासाठी करण्यात आला. २०१६ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत अगदी अनपेक्षितपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला. हा विजय साऱ्या जगासाठी धक्कादायक होता. हिलेरी क्लिंटनसारख्या बलशाली दावेदाराला हरवून ट्रम्प महासत्तेच्या गादीवर आले. या साऱ्या प्रकारानं अनेकांची भाकीतं चुकीची ठरली. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केल्याचं श्रेय केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय डेटा विश्लेषक कंपनीला दिलं जातं. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आमची चूक झाली, अशी कबुली दिली आहे त्यामुळे जगभर ‘डिलीट फेसबुक’ ही फेसबुकविरोधातली मोहीम सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

फेसबुकच्या डेटा लीकचं लोण आता भारतापर्यंत येऊन पोहोचले आहे. ज्या सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनीने फेसबुकचा डेटा लीक केल्याचा आरोप केला जात आहे, त्या कंपनीला २०१९ सालासाठी काँग्रेसने कॅम्पेनिंगसाठी निवडल्याचा आरोप केला जात आहे. यावरून ट्विटरवर #DataChorCongress हॅशटॅग वापरुन काँग्रेसला ट्रोल केले जात आहे. भारतात फेसबुकचे २० कोटी सदस्य आहेत. त्यांच्या वैयक्तिक गोपनीय माहितीचा दुरुपयोग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिला आहे.

मात्र सन २०१४ च्या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करूनच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर आले होते. 'अच्छे दिन' म्हणून जाहिरात करून लोकांना प्रभावित करण्यात आले. आता तेच तंत्रज्ञान वापरून काँग्रेस सत्तेवर येऊ पाहात आहे. लोकसभेच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा अवधी आहे, मात्र आतापासूनच राजकीय वातावरण तापत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व विरोधक एकत्र येवून 'मोदीमुक्त भारत' करण्यासाठी विळ्या भोपळ्याची मोट जुळवत आहेत.

सोशल मीडियाचा कितीही अतिरंजित वापर झाला तरी काय घ्यावे आणि काय घेवू नये हे आपल्या हाती आहे, कीर्तनाने माणूस सुधारत नाही किंवा तमाश्याने माणूस बिघडत नाही ! अशी मराठीत म्हण आहे. मग सोशल मीडियावर काहीही पोस्ट आली तरी त्यावर किती विश्वास ठेवायचा ? हे आपल्या हाती आहे. पण एक मात्र खरे आहे की, भाजपने आजपर्यंत जे पेरलं तेच उगवत आहे.परतीचा पाऊस सुरु झाला आहे.. त्यामुळे भाजपने सोशल मीडियाचा चांगलाच धसका घेतला आहे.

- सुनील ढेपे

९४२०४७७१११

Tags :