ब्लॉग 0 Comments 686 Likes       02 May 2018

न्यूड : दुसरी बाजू !

नटरंग, टाईमपास, बालक पालक असे एकापेक्षा एक सरस चित्रपट काढणाऱ्या रवी जाधव याचा 'न्यूड' चित्रपट नुकताच रिलीज झालाय, हा चित्रपट पाहून चित्रपट परीक्षक नसलेली परंतु स्वतःला पुरोगामी आणि विचारवंत समजल्या जाणाऱ्या काहींच्या पोस्ट वाचल्या आणि न्यूड चित्रपट जाणीवपूर्वक पाहिला.

चित्रपट चांगला झालाय,चित्रपटाची प्रत्येक फेम जबरदस्त झाली आहे.हा एक आर्ट आणि मसाला चित्रपट आहे, तो चित्रपट म्हणूनच पहावा.या चित्रपटाला माझा अजिबात विरोध नाही, कल्याणी मुळ्ये आणि छाया कदम यांचा सशक्त अभिनय पाहण्यासाठी हा चित्रपट एकवेळ जरूर पहावाच!

आई आणि तिच्या मुलाच्या संघर्षाची ही कहाणी आहे, स्वतः चा पैलवान नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागतो, मारझोड करतो म्हणून यमुना ( कल्याणी मुळ्ये ) मुंबईत मावशी चंद्राक्का ( छाया कदम ) हिच्याकडे येते, मुलास ( मदन देवधर ) खूप शिकवण्याची तिची इच्छा असते म्हणून मुंबई गाठते, पण अनेक ठिकाणी शोधूनही कामधंदा मिळत नाही म्हणून शेवटी मावशी प्रमाणे न्यूड मॉडेल म्हणून काम करते, पण मुलाला शिक्षणापेक्षा चित्रकलेची आवड पाहून ती चिंतेत पडते , एकेदिवशी तोही ज्या महाविद्यालयात आपण काम करतो, तेथेच येईल या घालमेलने त्यास शिक्षणासाठी औरंगाबादला बळजबरीने पाठवते, परंतु यामुळे मुलगा आईवर संशय घेतो,तिकडे जावून सतत पैश्याची मागणी करतो,त्यासाठी आई यमुना न्युड मॉडेल म्हणून बाहेरची खूप कामे करते, पैसे कमावते आणि मुलालाही पाठवते. इकडे मुंबईत संस्कृती रक्षक म्हणणारे न्यूड चित्र काढण्यावर बंदी घाला म्हणून मोर्चा काढतात, कला महाविद्यालयात येवून न्यूड चित्राची मोडतोड करतात पण मुलाचे आणि इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबता कामा नये म्हणून यमुना पुन्हा न्युड मॉडेल म्हणून काम करायला तयार होते, पण शेवटी मुलगा अर्धवट शिक्षण सोडून मुंबईत येतो, आईच्या चारित्र्यावर संशय घेतो , मुलाचे वागणे पाहून आई समुद्रात जावून जीव देते ! त्यानंतर एका वर्षानंतर एकेदिवशी मुलगा आर्ट गॅलरीमध्ये न्यूड चित्राचे प्रदर्शन पाहण्यासाठी जातो आणि स्वतःच्या आईचे न्यूड चित्र पाहून चित्रे काढणाऱ्याच्या थोबाडीत सणसणीत मारतो आणि चित्रपट समाप्त होतो.

दोन तासाचा हा चित्रपट कधी संपला हे कळतच नाही, कारण चित्रपट ज्या खुबीने तयार केला आहे, त्याला तोड नाही. मनात मात्र विचाराचे काहूर निर्माण होते.

काही प्रश्न

1.निसर्ग इतका सुंदर आहे,त्यात राहणारे पशु, पक्षी, जनावरे, झाडे, डोंगर, दऱ्या खोऱ्या , धबधबा, प्रेक्षणीय स्थळे याची किती तरी चित्रे काढली तरी ती कमीच आहेत परंतु जगात स्त्रीच्या न्यूड चित्रालाच किंमत अधिक का आहे ?
नसिरुद्दीन शहा यांनी सुद्धा चित्रपटात यमुनेशी संवाद साधताना हाच प्रतिप्रश्न केला आहे.

2. मुलाचे शिक्षण व्हावे ही यमुनाची इच्छा असते पण तो चित्रकलेकडे येता कामा नये ही तिची भावना का असते, पण मुलाचा चित्रकलेचा हट्ट पाहून त्याला चित्रकला शिकवण्याचा निर्णय घेते पण मुंबईत न ठेवता औरंगाबादला पाठवते कारण मुलाला आपण न्यूड मॉडेल असल्याचे कळता कामा नये, ही तिची भावना असते, यातून तिच्या मनात निर्माण झालेली भीती आणि घालमेल हे पडद्यावर पाहणे अधिक उचित आहे !

महिलेचे न्यूड चित्रे काढणाऱ्या कलाकारांना दुसऱ्याची आई किंवा बहीण न्यूड मॉडेल म्हणून हवी आहे, तिथे स्वतःची आई आणि बहीण का चालत नाही किंवा त्यांच्या चित्राचे प्रदर्शन का लावत नाहीत, हा एक यानिमित्ताने विचारला जाणारा प्रश्न आहे.
यात चंद्राक्काचा एक संवाद देखील आहे,गरीब बाई कपड्यात देखील लोकांना नग्नच दिसते.

3. आई इतकी कमजोर आहे का ? तिला मुलाच्या शिक्षणासाठी शेवटी न्यूड मॉडेल म्हणून काम करावे लागते ? चित्रकला म्हणून महिलेला न्यूड पाहणे कितपत योग्य वाटते ?
अशी चित्रे पाहणारे कला म्हणून कितीजण पाहतात आणि विकृती म्हणून किती पाहतात ?

(आमची अनाथाची माय सिंधूताई नेहमी म्हणते, बाई नऊवारीतच जास्त शोभून दिसते, तिने अंगभर कपडे घालावेत, मग समाज तिच्याकडे वाकड्या नजरेने कधी पाहणार नाही )

या चित्रपटात सुद्धा चंद्राक्का यमुनेशी संवाद साधताना बोलते, प्रत्येक वासनांध पुरुषाची नजर बाईच्या छातीवर असते,त्यासाठी कपाळावर मोठं कुंकू लावायचं , म्हणजे रेड सिग्नल ! स्टॉप !

मुंबईत कुणाला घाबरायचं नाही, आरे म्हटले की मोठ्याने कारे म्हणायचे !! या चित्रपटातील प्रत्येक संवाद ठसकेबाज ठरला आहे.

एक मात्र खरे आहे की, बाईच्या चित्राला आणि त्यात न्यूड चित्र असेल तर जगात किंमत अधिक का आहे ?

चित्रकलेच्या नावाखाली रवी जाधव याने चित्रपटात स्त्रीला न्यूडमध्ये उभे करून एक चांगला आर्ट आणि मसाला चित्रपट केला आहे, हा चित्रपट जरूर पहावा पण एक चित्रपट म्हणूनच,फार तर कला म्हणून ! उगीच समर्थन करत बसू नये !
चित्रे काढणाऱ्यास न्यूड महिलेविषयी काही वाटत नसेलही पण अशी चित्रे पाहणारे कला म्हणून पाहतात की वाकड्या नजरेने किंवा विकृती म्हणून पाहतात, हा एक गहन प्रश्न आहे. कला पहायची असेल तर वेरूळ, अजिंठा लेणी का कमी आहे ? त्यासाठी चित्रपटात स्त्रीला न्यूडमध्ये उभा करणे आणि चित्रकला आहे म्हणून चित्रपट पाहा म्हणून सांगणे कितपत योग्य ?

तथाकथित विचारवंतांना प्रश्न

न्यूड मॉडेल म्हणून झोपडपट्टीतील बाई चालते, ती दुसऱ्याची आई आणि बहीण असावी पण त्याजागी स्वतःची असेल तर ?

पडला ना प्रश्न ?

चित्रपट परीक्षण करणं सोपं असतं, प्रत्यक्षात अवघड असतं रे बाबांनो !

चित्रपट का पहावा ?

कल्याणी मुळ्ये आणि छाया कदम यांचा दमदार आणि सशक्त अभिनय आणि वेगळा विषय !

का टाळावा ?
स्त्रीला वारंवार न्यूड दाखवल्यामुळे ...

लेखन
सुनील ढेपे
पत्रकार
पुणे / उस्मानाबाद
9420477111

Tags :