मुक्तरंग 0 Comments 1484 Likes       01 May 2018

पंकज देशमुख यांचे चांगभले !

 शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदवण्यास आलेल्या पीडित महिलेस एक नव्हे तब्बल १८ तास ताटकळत ठेवणारे  आनंदनगर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक देविदास गात यांची अखेर पोलीस नियंत्रण कशात उचलबांगडी करण्यात आली आहे, मात्र बदली ही कारवाई होत नाही, केवळ जनक्षोभ शांत करण्यासाठी रचलेली ही  खेळी आहे. गातला अभय देण्यात आल्याचे यातून अधोरेखीत होते.

उस्मानाबाद शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशन खरे तर सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. पुण्याला बदली करून  गेलेला सपोनि दिगंबर भवानी  शिंदे हा तर पोलीस स्टेशन म्हणजे स्वतःची 'जहागिरी' समजत होता, सत्य प्रकरणे दाबून ठेवणे, तोडपाणी झाली नाही तरच गुन्हा दाखल करणे, खोट्याचे खरे आणि खऱ्याचे खोटे करणे यात शिंदे माहीर होता.   पोलीस स्टेशनचा वर्धापनदिन साजरा करून दोन नंबरवाल्याना पोलीस स्टेशनमध्ये शाही जेवण देण्याचा पायंडा त्याने पाडला  होता. त्याने आपल्या कारकिर्दीत सर्व अवैध धंदे खुलेआम सुरू ठेवले होते.त्याची बदली  बीडीडीएसला झाल्यानंतर  नव्याने आलेले पोलीस निरीक्षक डी. बी. उर्फ देविदास गात यांनी तोच कित्ता गिरवला होता.

10 एप्रिल रोजी शिक्षण विभागातील एक महिला सकाळी 11 वाजता  शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदवण्यास पोलीस स्टेशनमध्ये  येते,  तक्रार तत्काळ नोंदवणे अपेक्षित असताना तब्बल  18 तास ताटकळत ठेवण्यात येते आणि आरोपी असलेल्या सचिन जगताप यास पोलीस गुन्हा दाखल करण्याअगोदर बोलावून घेतात आणि 'डील' झाल्यानंतर पाहुणचार करून पाठवून देतात, हे सर्व संतापजनक आहे.

खरं या प्रकरणात गातची माध्यमात बातम्या आल्यानंतर त्याच दिवशी बदली करायला हवी होती, त्यासाठी पोलीस अधीक्षकानी 15 दिवस घातले.बरं आता 15 दिवस गेल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी केवळ बदली करून एकप्रकारे पाठीशी घातले आहे. या प्रकरणात उपअधीक्षक मोतीराम राठोड यांनी जो अहवाल दिला आहे, तोच मुळात  संशयास्पद आहे. एक पीडित महिला न्यायालयात शपथपत्र देवून पोलिसांनी कसा छळ केला हे सांगितले असताना, अहवालात 'क्लीन चिट'' मिळतेच कसे हे सर्व अजब आणि गजब आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी गुंतले असल्याचा संशय व्यक्त होत असून, त्यामुळेच मोकाट जगतापला अटक होत नाही, हेही  निर्विवाद सत्य आहे.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख जॉईन होवून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत, लवकरच त्यांची बदली होईल,या  दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व 18 पोलीस स्टेशन चकाचक करण्याचे काम त्यांनी केले पण कारभार मात्र अधिक भंगार आणि  गचाळ ठरला, त्यांची एकही भरीव कामगिरी दिसली नाही, उलट पोलीसच विविध गुन्ह्यात अडकले, काहींजण जेलमध्ये गेले तर काही जण बचावले.

फुलवाडी दरोडा प्रकरणात चार कोटीवर डल्ला मारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अनिल किरवाडे यांच्यासह चार पोलिसांना जेलमध्ये जावे लागले तर पत्नीची हत्या केल्याप्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशनचे  सपोनि विनोद चव्हाण यांना गजाआड व्हावे लागले, ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस आरोपींना कस्टडीमध्ये घालत होते, त्याच कस्टडीमध्ये बसण्याची वेळ पोलीसावर आली. पंकज देशमुख यांच्या काळात पोलिसांच्या अब्रूचे अक्षरशः धिंडवडे निघाले.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख तोंड पाहून कारवाई करतात, अशी तक्रार बहुतांश पोलिसांची आहे, हत्यारे साफ ठेवली नाही म्हणून किरकोळ कारणावरून नळदुर्गचे सपोनि रमाकांत पांचाळ यांना निलंबित करण्यात आले होते, मात्र मर्जीतील  सपोनि संभाजी पवार, दिगंबर शिंदे, मुस्तफा शेख  यांना अभय देण्यात आले, गातलाही आता अभय मिळाल्यात जमा आहे. 

मुळात पोलीस अधिक्षकांना 'सिंघम' पोलीस अधिकारी नको आहे,  जेवढे सांगितले तेवढे करणारा अधिकारी हवा  आहे, पांचाळ त्यातील नव्हते म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली.झोलूगिरी करणाऱ्याना मात्र अभय मिळाले.'राजा बोले आणि दल हाले' अशी अवस्था पोलीस खात्याची आहे. म्हणूनच उस्मानाबाद जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, अनेक प्रकरणे दाबली जात आहेत आणि गुंडगिरी, दडपशाही वाढली आहे आणि अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. असा निष्क्रिय पोलीस अधीक्षक यापूर्वी कधी झाला नाही आणि होणार नाही.

त्यामुळेच पंकज देशमुख यांचे चांगभले !

 

-  सुनील ढेपे

संपादक, उस्मानाबाद लाइव्ह

9420477111

 

Tags :