ताज्या बातम्या 0 Comments 255 Likes       23 May 2018

अपहार केल्याप्रकरणी खेर्डा सरपंच व ग्रामसेवकाविरूद्ध गुन्हा

कळंब : पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअतंर्गत गेल्या वर्षी जलसंधारणाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल सरकारकडून मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेतून ८५ हजार ४० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी खेर्डा (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील सरपंच व ग्रामसेवकाविरूद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गेल्या वर्षी खेर्डा गावाने जलसंधारणाचे उत्कृष्ट काम केले. त्यामुळे तालुक्यातून या गावाला द्वितीय क्रमांक मिळाला. ग्रामस्थांच्या श्रमदानामुळे अवघ्या १३ हजार ३०० रुपयांच्या लोकवाट्याद्वारे गावशिवाराचा चेहरामोहरा बदलला. त्यामुळे सरकारकडून द्वितीय क्रमांकाचे सात लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस या गावाला मिळाले. ही रक्कम सरपंच व ग्रामसेवकाच्या संयुक्त असलेल्या ग्रामनिधी बँक खात्यात २५ जानेवारी रोजी वर्ग करण्यात आली.

ग्रामपंचायतीने ठराव घेऊन ही रक्कम जलसंधारणाच्या कामावर खर्च करणे अपेक्षित होते. मात्र या कामावर खर्च न करता रक्कम खात्यावर तशीच ठेवली. त्यामुळे गावातील पाणी फाउंडेशन समितीचे अध्यक्ष सुनील लिके पाटील व सचिव भास्कर लोकरे यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे २४ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला २७ एप्रिल रोजी दिले. चौकशी होणार असल्यामुळे ग्रामपंचायतीने या रकमेचा धनादेश गावातील पाणी फाउंडेशन समितीला दिला. मात्र सरपंच व ग्रामसेवकांच्या बँक खात्यावर ८५ हजार ४० रुपये कमी असल्याने तो धनादेश वटला नाही.

 

या प्रकरणाची चौकशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी टी. जे. जाधव यांनी केली असता, ८५ हजार ४० रुपयांच्या शासकीय रकमेचा सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून अपहार केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सरपंच सविता पोपट भंडारे व ग्रामसेवक शशिकांत पवार यांच्याविरूद्ध विस्तार अधिकारी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २१) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. बी. वाघुले तपास करीत आहेत.

 

Tags :