ताज्या बातम्या 0 Comments 777 Likes       27 Jun 2018

शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

उस्मानाबाद - कर्ज माफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप न केल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन आणि वाशी तालुक्यातील तीन अश्या सहा शाखा व्यवस्थापकांवर मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफी करण्यात आली होती. याचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने कर्जवाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, उस्मानाबाद  व उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी दिले होते. तरीही या आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया कळंब या शाखेचे व्यवस्थापक कृष्णकांत मारुती काळे व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आंदोरा या शाखेचे व्यवस्थापक महेश आनंद गावकर यांच्यावर कळंब पोलिसात बालाजी शरणाप्पा कटकदोंड सहायक निबंधक सहकारी संस्था कळंब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिसात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 26 ) पिककर्ज वाटपाच्या बाबतीत आढावा घेतला होता. त्यानुसार यामध्ये अनेक बँकानी अनेकवेळा सूचना देऊनही याबाबतीत काहीच कार्यवाही केलेली नसल्याचे बैठकीत पुढे आले. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकांच्या शाखा व्यवस्थापकाविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे सहकार विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री उशीरा पाच तर बुधवारी (ता. २७) सकाळी एका शाखेच्या विरोधात गुन्हे दाखल केले. कलम 188 नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये लोकसेवकांच्या आदेशाचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या बँकेच्या शाखेनी एक टक्क्यापेक्षा कमी पिककर्ज वाटप केले आहे, अशा शाखांवर ही कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाची कळंब, अंदोरा, मंगरुळ या शाखांचा समावेश आहे.  वाशी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पारगाव, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तेरखेडा या शाखांच्या विरोधात तालुका सहायक निबंधकांनी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन  फिर्याद दिली आहे. त्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यानी दिली.

पीक कर्जवाटप न केल्याने थेट बँक अधिकाऱयांवर गुन्हा दाखल होण्याची उस्मानाबाद जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचा दावा करण्यात येत आहे.असे गुन्हे राज्यभर दाखल झाल्यास बँक अधिकाऱ्यांची झोप उडणार आहे. 

 

Tags :