उस्मानाबाद 0 Comments 262 Likes       29 Mar 2017

दोन महाविद्यालयीन तरुणांचा बोरी नदीत बुडून मृत्यू

नळदुर्ग - दोन दिवसांपूर्वी 'आपलं घर' येथील वसतिगृहातून बेपत्ता झालेल्या दोन महाविद्यालयीन युवकांचे मृतदेह मंगळवारी (दि.२८) सकाळी रामतीर्थ शिवारातील बोरी नदीच्या पात्रात तरंगताना आढळले. पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विठ्ठल महादेव माळी (१७, रा. पाडोळी, ता. उस्मानाबाद ) योगेश गुंडू कुंभार (१७, रा. कोराळ ता. उमरगा) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. विठ्ठल योगेश हे दोन विद्यार्थी येथील बालाघाट महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत होते. दोघांचेही वडील लहानपणीच वारल्याने घरची परिस्थिती बेताची होती. आई नातेवाइकांनी त्यांना पाचव्या वर्गापासून येथील 'आपलं घर' प्रकल्पात शिक्षणासाठी घातले. दहावीनंतर हे दोघे आपलं घर'च्या वसतिगृहात राहून महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. दरम्यान, रविवारी (२६) दुपारी तीन नंतर ते वसतिगृहातून बेपत्ता झाले. 'आपलं घर'च्या प्रशासनाने नातेवाईकांना घटनेची माहिती देऊन शोधाशोध केली. मंगळवारी दुपारी रामतीर्थ शिवारातील बोरी नदीच्या पात्रात काही शेतकऱ्यांना दोन मृतदेह तरंगताना आढळले. पोहता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पीएसआय मजहर सय्यद, अनिल किरवाडे यांनी पंचनामा केल्यानंतर जळकोट येथे शवविच्छेदन करण्यात आले.

Tags :