उस्मानाबाद 0 Comments 276 Likes       01 Apr 2017

डीसीसी’तील तेरा कर्मचाऱ्यांच्या बदल्या

कळंब : तालुक्यातील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेतील विविध शाखानमधील १३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत; मात्र या बदल्यांवर जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रभाव असल्याचा, तसेच यामध्ये राजकारण झाल्याचा आरोप होत असल्याने या बदल्याच आता वादात सापडल्या आहेत.

कळंब तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमधील १३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे यांनी ३० मार्च रोजी जारी केले आहेत. कार्यालयीन व प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून १३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे, असेही घोणसे यांनी स्पष्ट केले आहे. बँकेने या बदल्यांसाठी प्रशासकीय कारणे दिले असले तरी यामध्ये राजकारण झाल्याचा आरोप बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला. नुकत्याच झालेल्या जि.प. निवडणुकीत ज्या गावांनी बँकेतील सत्ताधारी मंडळींच्या पक्षाला झुकतेमाप दिले तेथील कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. तसेच बँक कर्मचाऱ्यांतील नातेवाईकांनी कोठे सत्ताधारी मंडळींच्या विरोधात काम केले असेल अशा कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून गैरसोयीच्या ठिकाणी टाकण्यात आल्याचे काहींचे म्हणणे आहे. बदल्या या पूर्णपणे प्रशासकीय बाब असताना कळंब येथे बैठक घेऊन बँकेतील सत्ताधारी मंडळींनी कार्यकर्त्यांची बदल्यासंदर्भात वैयक्तिक मते घेतली. एका बँक कर्मचाऱ्याने माझे ऐकले नाही, त्याची बदली करा अशी थेट शिफारस एका ग्रामीण कार्यकर्त्याने केली व ३० मार्चच्या बदली आदेशामध्ये त्याचे नाव आले. त्यामुळे बँक कार्यकर्त्यांच्या मनावर चालवायची आहे का? शेतकरी सभासदांसाठी चालवायची आहे? असा संतप्त सवालही सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे.

Tags :