उस्मानाबाद 0 Comments 346 Likes       12 Apr 2017

स्टेडियमवर साकारतोय तीस फूट उंच सभामंडप

उस्मानाबाद : येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या परिसरात २१ एप्रिलपासून होऊ घातलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची तयारी सुरू आहे. मुख्य रंगमंचाच्या उभारणीला वेग आला असून, शहरात पहिल्यांदाच एवढा भव्य सभामंडप उभारला जात आहे. विशेष म्हणजे क्रीडा संकुलावर एकही खड्डा न घेता आधुनिक सामग्रींचा वापर करून हा रंगमंच उभारला जात आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या परिसरात पहिल्यांदाच अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या पर्वणीचा योग आला आहे. त्यासाठी संयोजन समितीच्या वतीने जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. क्रीडा संकुलाच्या परिसरात ६८ हजार स्क्वेअर फूट आकाराचा ३० फूट उंच भव्यदिव्य असा मुख्य सभामंडप उभारण्यात येत आहे. उस्मानाबाद शहरात पहिल्यांदाच नाट्यसंमेलनाच्या रुपाने अशा पद्धतीचा भव्य सभामंडप उभारला जात आहे.

क्रीडा संकुलावर उभारणी करताना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, याची दक्षता संयोजन समितीच्या वतीने घेण्यात आली आहे. आधुनिक सामग्रीचा वापर करून उभारण्यात आलेल्या सभामंडपात एकाही ठिकाणी खड्डा खोदण्याची वेळ आली नाही. या व्यतिरिक्त नगरपालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यसंकुल आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय या ठिकाणीही स्वतंत्र दोन रंगमंच उभारले जात आहेत. तुळजाभवानी क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या मुख्य रंगमंचालगत भव्य ग्रंथप्रदर्शनासाठी स्टॉल्सची उभारणी केली जात आहे. प्रकाशन संस्थांनी आपली नावे संयोजन समितीकडे नोंदवावी, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे.

 

Tags :