उस्मानाबाद 0 Comments 448 Likes       22 Apr 2017

जानकर यांच्या हस्ते पशुवैद्यकीय संस्थांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण

उस्मानाबाद -यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आज पशुसंवर्धन,दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे सहपालकमंत्री  महादेव  जानकर यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

    यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण,आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हा परिषदचे अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील,पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप,प्रभारी  जिल्हाधिकारी अविनाश पाठक,जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.सूर्यवंशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    प्रारंभी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुकणे यांनी 19 संस्थांनी आयएसओ  मानांकन प्राप्त केले असून 40 संस्था प्रस्तावित आहेत व उर्वरित संस्था लवकरच आयएसओ  मानांकन प्राप्त करून घेतील  अशी माहिती  विशद केली.

     सहपालकमंत्री श्री. जानकर  यांनी उस्मानाबाद जिल्हयात पशुसंवर्धन विभागाने लोकसहभागातून आयएसओ कार्यक्रम राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. सर्व आयएसओ संस्था प्रमुखांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. श्री.जानकर म्हणाले की, शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी कौशल्य प्राप्त करून शेतीशी संलग्न व्यवसाय करावा. यापुढे शेतकऱ्याला सन्मानाने जगायचे  असेल तर पशुसंवर्धनाशिवाय पर्याय नाही. भविष्यात सर्वांत  जास्त  रोजगार  हा  विभाग उपलब्ध करून देणार आहे.  यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी उस्मानाबादी शेळी विकास प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतची  मागणी केली.

    जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी मनोगत व्यक्त करून  आयएसओ  प्राप्त संस्थांचे अभिनंदन केले.शेवटी डॉ. शितलकुमार मुकणे यांनी सर्वांचे आभार मानले.

Tags :