उस्मानाबाद 0 Comments 530 Likes       13 Jul 2017

हारून कसं चालंल, हाय त्याला तोंड द्यावंच लागंल!

उस्मानाबाद - ‘‘हंगामाच्या तोंडावर यंदा पावसानं चांगली सुरवात केली... थोडी बहुत आशा व्हती पण आता पुन्हा तो गायब झालाय अन्‌ पिकं दरवरसाप्रमाणं यंदाही माना टाकण्याच्या तयारीत हायती... नुसतं पावसाचंच काय सायेब, आमच्या डोळ्यासमोर आम्हाले आमचं नशीब दिसतेय... पण हारून कसं चालंल, हाय त्याला तोंड द्यावंच लागलं,’’ अशा शब्दांत एक हात गमावलेला असताना आणि निसर्गाचं संकट पुन्हा ओढावलेलं असतानाही गावातील एका शेतकऱ्याशी सावड करून त्याच हाताने सोयाबीनची कोळपणी करणारे उपळा (जि. उस्मानाबाद) येथील शेतकरी शहाजी शेटे यांची धडपड, बोलण्यातील विश्‍वास आणि सकारात्मक ऊर्जा कोणत्याही धडधाकट माणसाला लाजवेल, अशीच होती.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उपळा. पॉलिहाउसचे गाव म्हणूनही ओळखले जाते. आख्खा गावात ५० हून अधिक पॉलिहाउस आहेत. धाडसी, धडपडे आणि तेवढेच जिद्दी शेतकरी इथे पाहायला मिळतात. उपळ्याच्या जरबेराने आंध्र प्रदेशमधील हैदराबाद आणि मुंबईच्या फूलबाजारावरही वर्चस्व मिळवले आहे. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून या भागातील फूलशेती अडचणीत आली आहे. कधी दुष्काळाची झळ, तर कधी गारपिटीचा मारा, या सगळ्यातून शेतकरी पार मेटाकुटीला आले आहेत. यंदाही त्याच वाटेवर हे गाव आले आहे. त्यापैकीच एक प्रातिनिधिक शेतकरी शहाजी शेटे. शहाजी यांची पाच एकर शेती आहे. विहीर आहे, पण हंगामी. दोन मुली, एक मुलगा आणि पत्नी असे शहाजी यांचे कुटुंब. मुली दिल्या घरी गेल्या, मुलगा सध्या बीएस्सी ॲग्रीच दुसऱ्या वर्गातील शिक्षण घेतोय, लहानपणी मोटार दुरुस्तीसाठी विहिरीत उतरताना झालेल्या अपघातात त्यांचा हात गमावला. पण गमावलेल्या हाताशिवाय एका हाताने संसाराचा गाडा त्यांनी रेटला नव्हे, संकटाला पाय पसरण्याची त्यांनी कधी संधीच दिली नाही. 

दरवर्षी सोयाबीन हे त्यांचे हुकमी पीक. पण गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन काही हाती सापडत नाहीय. यंदाही त्यांनी तीन एकरवर सोयाबीन केले आहे. आता कोळपणीला आले. मध्यंतरी एक-दोनदा हलका पाऊस झाला, त्यावरच ते तरले. पण आता पावसाची नितांत गरज आहे. पण महिना झाला पावसाने पाठ फिरवली. आता या आठवड्याभरात पाऊस झाला नाही, तर पीक केव्हाही माना टाकेल, अशी परिस्थिती आहे. पण आभाळाकडे डोळे लावत, त्यांनी आता सोयाबीनची कोळपणी चालू केली आहे. त्यासाठी गावातील त्यांचे मित्र श्रीकांत मुंदडा यांनी त्यांची मदत घेतली आहे. सावड करून ते सध्या कोळपणी करताहेत. 

शहाजी सांगत होते, ‘‘की गेल्या दोन वर्षांत दुष्काळ, गारपिटीने काहीच हाताला लागलं नाही. गेल्यावर्षी २०-२५ क्विंटल निघाले, पण दर मिळाला न्हाई, त्याच्या आदल्यावर्षी फकस्त पाच-सहा क्विंटलच निघाले. आता पुन्हा यावर्षी आशा हाय, पण कशाचं काय, पाऊसच न्हाई. पेरणीसाठी सोयाबीनच्या पिशवीसाठी हातउसणं घेतलं आहे, त्याचं तर काही निघतंय का कुणास ठाऊक,’’ असं सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली.

नवं-जुनं केलं, आता कुठचं कर्ज मिळणार
माझ्याकडं पहिलाच जिल्हा बॅंकेचं ५० हजारांचं कर्ज हाय, चार-पाच वर्षे झाली त्येलं. यंदाही मार्चमध्ये याज भरून नवं-जुनं केलं. आता कुठलं कर्ज आणि माफी मिळणार. सरकारचं २५ हजार मिळण्यासाठी, मला २५ हजार भराव लागणार? कशाचं काय? मला काय समजतंच न्हाई, असं म्हणत शहाजी शेटे यांनी कर्जमाफीच्या निर्णयाचंही त्रांगडं कसं झालं आहे, यावर उत्तर दिलं.

माझी शेती भरपूर आहे. यंदा खरिपासाठी उसनवारी करूनच भागवलं आहे. शेतात पाणी तसं हंगामीच आहे. पण सगळं गणित पावसाच्या भरवशावर अवलंबून आहे. यंदाही सगळं कोरडंच जातंय का कुणास ठाऊक. माझंही डिसीसीत १ लाख ८० हजारांचं कर्ज आहे. पण नवं-जुनं केल्याने थकबाकीदार नाही. त्यामुळे माफीत मी सापडत नाही आणि नियमित करायला हातात पैसे नको का?
- श्रीकांत मुंदडा, शेतकरी, उपळा, जि. उस्मानाबाद

माझी दोन एकर शेती आहे. सगळं सोयाबीन आहे. हैदराबाद बॅंकेच्या शाखेचं माझं ६० हजाराचं कर्ज आहे. गेल्यावर्षी चार हजारांचं व्याज भरलंय, पुन्हा काय भरण झालंच नाही. गेल्या दोन-तीन वर्षांत हाताला काहीच लागलं नाही. यंदा पण काही खरं वाटत नाही, बॅंकेचंही नवं-जुनं केल्यानं लाभात बसत नाही. 
- अशोक पडवळ, शेतकरी, उपळा, जि. उस्मानाबाद

Tags :