उस्मानाबाद 0 Comments 591 Likes       29 Jul 2017

शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यासदौऱ्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

उस्मानाबाद:- शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय न राहता उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नविन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल,विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यत त्यांच्या गरजेनुरुप योग्य वेळी पोहचविणे निकडीचे आहे.यासाठी शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे सन 2017-18 मध्ये कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील जे शेतकरी अभ्यासदौऱ्यासाठी इच्छिूक आहेत त्यांनी दि.31 ऑगस्ट 2017 पर्यंत संबधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, श्री.शिरिष जमदाडे यांनी केले आहे.

   विविध देशांनी विकसित केलेले शेतिविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शेतकरी , शास्त्रज्ञ यांच्याशी चर्चा व क्षेत्रीय भेट इ.द्वारे शेतकऱ्याचे ज्ञान व क्षमता उंचावण्याकरीता वय वर्ष 25 ते 60 वर्ष असलेल्या शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे सन 2017-18 मध्ये कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहेत.

 उस्मानाबाद जिल्हयातील जे शेतकरी अभ्यासदौऱ्यासाठी इच्छिूक आहेत त्यांनी दि. 31 ऑगस्ट 2017 पर्यंत संबधित तालुका कृषि अधिकारी, कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत. सदर प्रस्तावासोबत शेतकऱ्याचा अर्ज, चालू वर्षाचा 7/12 व 8 अ, जन्मतारखेचा पुरावा, शिक्षण प्रमाणपत्राची झेरॉक्स,  शेतकरी कुटुंबाची शिधापत्रीका झेरॉक्स, वैध पारपत्राच्या सर्व पानाची   झेरॉक्स, स्वत:शेतकरी असल्याचे शेतकऱ्याचे स्वसांक्षाकित प्रमाणपत्र, शासकिय / निमशासकिय नोकरीत नसल्याचे  व डॉक्टर, वकील, सी.ए, अभियंता, कंत्राटदार इ.व्यवसायीक नसल्याचे शेतकऱ्याचे स्वसांक्षाकित प्रमाणपत्र,पुर्वी शासकिय अर्थसहाय्याने विदेश दौरा केला नसल्याचे प्रमाणपत्र, शारीरीक स्वास्थ्य योग्य असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, प्रपत्र-1 व 2 शेतकऱ्यांच्या फोटोसहीत व इतर कागदपत्रे संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 31 ऑगस्ट 2017 पर्यंत सादर करावेत.

अधिक माहितीसाठी उस्मानाबाद जिल्हयातील इच्छूक शेतकऱ्यांनी संबधित तालुका कृषि अधिकारी व उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, श्री.शिरिष जमदाडे यांनी केले आहे.

Tags :