उस्मानाबाद 0 Comments 506 Likes       27 Aug 2017

भूम तालुका विकासापासून कोसो दूर

भूम - भूम तालुक्‍याचा बहुतांश भाग डोंगराळ आहे. शेती हाच प्रमुख व्यवसाय असून, अनेक जण दुधाचा जोडव्यवसाय करतात. उपजिल्ह्याचा दर्जा असलेले, तसेच राजकीय क्षेत्रात दबदबा असणारे शहर अन्‌ तीन आमदारांचे गाव असतानाही भूम तालुका विकासापासून कोसो दूर आहे.

एमआयडीसी असतानाही गेल्या वीस वर्षांत एकही दखल घेण्यासारखा उद्योग उभा राहिला नाही. लघुउद्योग सुरु झाले; मात्र फार काळ टिकलेच नाहीत. बाटलीबंद पाणी, दुधाचे व्यवसाय उभारण्यात आले अन्‌ बंदही झाले. सध्या खाद्यतेल व दुधापासून खवा तयार करण्याचा एकमेव छोटा व्यवसाय चालू आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या अपेक्षांवरही पाणी फिरले. शहरात जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांचे उपविभाग कार्यालये आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्यांचा वावरही जास्त आहे. येथे बसस्थानकाची व्यवस्था नाही, येथील कृषी उत्त्पन्न बाजार समितीत एकही मोठी अडत नाही.

 शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला माल अखेर बार्शी किंवा जामखेड येथे कवडीमोल भावात विकावा लगत आहे. भूम तालुका डोंगराळ भागात वसलेला असल्याने प्रामुख्याने शेती व्यवसाय केला जातो. त्यास जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो; मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या व्यवसायाला बसल्याने दुधाचे व्यवसायही बंद पडले आहेत. शेती व दूध व्यवसाय करीत तालुक्‍यात शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण पूर्ण केले; परंतु शहरात उद्योग धंदे नसल्याने पान टपरी, चहाचे हॉटेलसारखे व्यवसाय करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. तालुक्‍यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे.

 तालुका हा तीन आमदारांचे गाव म्हणून ओळख आहे. परंडा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे, विधान परिषदेतील भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर व शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत हे तीन आमदार असतानाही तालुका विकासापासून वंचित आहे. एमआयडीसी, बसस्थानक, बाजार समितीमध्ये चांगल्या सुविधा मिळत नाहीत. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. एमआयडीसीसह तालुक्‍यातील बसस्थानक, प्रशासकीय इमारत, तहसील, उपविभागीय पोलिस कार्यालयासह विविध विकासकामे रेंगाळली असल्याने भूम तालुका विकासापासून कोसो दूर आहे.

Tags :