उस्मानाबाद 0 Comments 320 Likes       27 Aug 2017

स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय कायम

कळंब - शासनाने स्वच्छ महाराष्ट्र ही संकल्पना गावागावांत राबविण्याची मोहीम हाती घेतली आहे. तालुक्‍यातील संपूर्ण गावे पाणंदमुक्त करण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले उचलली आहेत; परंतु तालुक्‍यातील सुमारे ८० टक्के शाळांतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींची मोठी कुंचबणा होत आहे. मोडकळीस आलेले दरवाजे, अस्वच्छतेअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय कायम असल्याने अनेक शाळांतील स्वच्छतागृहे नावापुरतीच उरली आहेत. 

विद्यार्थ्यांमध्ये लहानपणात स्वच्छताविषयक मार्गदर्शन करून वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवीत शिक्षणाचे संस्कार रुजविण्याचे काम ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून करण्यात येते. अशा विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरवीत शासनाच्या वतीने लाखो रुपये निधी खर्च करीत बांधलेले स्वच्छतागृहे नावालाच उभे असल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी, नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थी त्याचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्‍यातील प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत.

 अनेक शाळांमध्ये पाण्याची कायमस्वरूपी सोय नसल्यामुळे ते अडगळीला पडले आहेत. ८० टक्के स्वच्छतागृहाचे दरवाजे कुजलेले असून, भांडीही फुटलेली आहेत.

जिल्हा प्रशासनाने तालुक्‍यातील किती शाळांत स्वच्छतागृहांची सोय आहे, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र सोय आहे काय, याची माहिती मागविली आहे. प्रत्येक मुख्याध्यापकांनी स्वच्छतागृह असल्याचे सांगितले आहे; मात्र दुरुस्ती करणे आवश्‍यक असल्याचे कोणीही म्हटले नाही.  शाळेतील विविध सुविधा, समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे; परंतु स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेबाबतची बाब माहीत असतानाही कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेला खीळ बसत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांतून व्यक्त केल्या जात आहे.

तालुक्‍यातील काही शाळांत स्वच्छतागृहाचा अभाव असल्यामुळे खामसवाडी, मस्सा (खंडेश्‍वरी), गौर, मोहा, हावरगाव, मंगरूळ, येरमाळा येथे प्रत्येकी एक मुलांसाठी, तर मुलींसाठी नायगाव, खामसवाडी, कन्हेरवाडी, देवळाली येथे स्वच्छतागहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. एका स्वच्छतागृह बांधकामाची अंदाजपत्रकीय रक्कम एक लाख ७५ हजार रुपये आहे.

Tags :