उस्मानाबाद 0 Comments 510 Likes       27 Sep 2017

आनंदनगर ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा

मुरूम - जनतेतुन थेट सरपंचाचे निवडणुकीमध्ये उमरगा तालुक्यातील आनंदनगर ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा फडकला असुन सरपंच पदासह नऊपैकी सहा सदस्य निवडून आणुन काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यानी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. त्यानंतर शरण पाटील यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

राज्य सरकारने थेट जनतेतुन सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील आनंदनगर (ता. उमरगा) ग्रामपंचायतीला थेट सरपंच निवडीचा पहिला मान मिळाला आहे. या निवडणुकीत सरपंच पदासाठी दोन तर नऊ सदस्यासाठी आठरा उमेदवार निवडणुक रिंगणात आपले नशीब अजमावत होते. जिपचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या आलुर मतदारसंघातील निवडणूक असल्याने याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीची सुत्र स्वतः शरण पाटील यांनी हातात घेतली होती तर भाजपाने ही स्वतंत्र पँनल करून पहिल्यांदाच आपले नशीब अजमावले. मंगळवारी दोन पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. यावेळी ९१९ मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. बुधवार दि. २७ रोजी सकाळी मतमोजणी पार पडली यामध्ये काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार उमेश सोनकांबळे यांनी ५२३ तर भाजपाचे उत्तम कांबळे यांना ३८८ मते तर ८ नोटाला मते मिळाली आहेत. परीणामी काँग्रेसचे उमेश सोनकांबळे १३५ मताची आघाडी घेत जनतेचा सरपंच होण्याचा मान मिळवला. तर सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तबरेज मासुलदार, लक्ष्मीबाई चव्हाण, नवशाद चाऊस, चंद्रकला हावळे, महादेव कांबळे, तिमण्णा आपटे हे उमेदवार निवडून आले तर भाजपाचे भिमराव कांबळे, अनिता जाधव व हुसेनबी नदाफ हे उमेदवार विजयी झाले. निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदनगर व मुरुममध्ये गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतीषबाजी करुन विजयी जल्लोष साजरा केला. त्यानंतर जिपचे विरोधी पक्षनेते शरण पाटील व उमरगा पंसचे सभापती मदन पाटील यांच्या हस्ते नुतन सरपंच व विजयी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 

Tags :