उस्मानाबाद 0 Comments 288 Likes       20 Mar 2017

साकत प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय..!

परंडा : तालुक्यातील साकत मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची दुरवस्था झाल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ या कालव्याची दुरूस्ती केल्याशिवाय पाणी सोडु नये या मागणी साठी खंडेश्वर पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नवनाथ खैरे यांनी शनिवारपासून प्रकल्पावर अमरण उपोषण सुरु केले आहे.

साकत मध्यम प्रकल्पातुन खंडेश्वर पाणी वापर संस्थेच्या सर्व लाभधारक शेतकरी व संस्था यांनी रब्बी हंगामासाठी कालवा दुरुस्त करुनच उजव्या कालव्यातून पाणी सोडावे म्हणजे पाणी वाया जाणार नाही असे लेखी पत्र पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नवनाथ खैरे यांनी उस्मानाबाद येथील पाटबंधारे उपविभागाच्या (क्ऱ४) कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़ तसेच संस्थेकडील थकबाकी असलेली रक्कम भरणे बाबत पत्राची मागणी केली होती़

मात्र, कार्यकारी अभियंत्याकडून संस्था डिफाल्टर असल्याच्या नावाखाली परवाना नाकारून कालवा दुरुस्त न करता संबंधित विभागाकडून मागील ११ दिवसापासून कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. कालवे नादुस्त असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सदरील पाण्याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा न होता ओढे, नाले, शेती शिवार आदी ठिकाणी पाणी जात आहे.

संबंधित अधिकारी पाणी संस्था बंद पाडून मनमानी करीत पाणी सोडून प्रकल्पातील लाखो लिटर पाणी वाया घालवत आहेत. यासंबंधित विभागाने संस्थेच्या थकबाकीची रक्कम योग्य नसून, भरलेले पैसे जमा न करता अवास्तव रक्कम दिली आहे़ त्यामध्ये विसंगती असून, याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून सखोल चौकशी करुन संस्थेला न्याय द्यावा, अशी मागणी खंडेश्वर पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नवनाथ खैरे यांनी केली आहे़

 

Tags :