उस्मानाबाद 0 Comments 309 Likes       23 Mar 2018

पाच हजार लाच घेताना पकडले

तुळजापूर: सिंचन विहिरीचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीला पाठविण्यासाठी पाच हजार रूपये स्वीकारणार्‍या पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यकाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली़ ही कारवाई गुरूवारी दुपारी तुळजापूर येथे करण्यात आली असून, या प्रकरणी कनिष्ठ सहाय्यकासह हॉटेल चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तुळजापूर तालुक्यातील पाच जणांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेखालील ११ कलमी कार्यक्रमांतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरींचे रितसर प्रस्ताव पंचायत समिती विभागाकडे दाखल केले होते़ हे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत पाठविण्यासाठी पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक चैतन्य प्रतापराव जाधव यांनी दहा हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती़ या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस़आऱजिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी़व्हीग़ावडे, पोनि व्ही़आऱबहीर यांनी शहानिशा करून गुरुवारी दुपारी तुळजापूर पंचायत समितीच्या आवारात सापळा रचला़

यावेळी पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक चैतन्य प्रतापराव जाधव यांनी तक्रारदाराच्या कामासाठी दहा हजार रूपये लाचेची मागणी करून प्रथम हप्त्यापोटी पाच हजार रूपये स्वीकारून ते हॉटेल चालक अजीम अल्लाउद्दीन तांबोळी यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले़ यानंतर पथकाने दोघांविरूध्द कारवाई केली़ या प्रकरणी कनिष्ठ सहाय्यक चैतन्य जाधव व हॉटेल चालक अजीम तांबोळी या दोघांविरूध्द तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोनि व्ही़आऱबहीर हे करीत आहेत़

Tags :