उस्मानाबाद 0 Comments 150 Likes       26 Apr 2018

तारेमध्ये वीज प्रवाह; तिघी चिकटल्या, एकीचा मृत्यू

भूम- शहरातील शिवशंकर नगर भागात किरायाच्या खोलीत राहत असलेल्या आजी, मुलगी व नात धुतलेल्या कपडे तारेवर वाळू घालत असताना त्यामध्ये विद्युतप्रवाह असल्याने एकापाठोपाठ एक चिकटल्या गेल्या. यावेळी प्रसंगावधान राखून शेजाऱ्यांनी लाकडाने त्यांना तारेपासून वेगळे केले असले तरी या दुर्दैवी घटनेत महिलेचा मृत्यू झाला तर तिची आई व मुलगी गंभीर जखमी झाल्या. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.२५) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली.

मुळ परंडा येथील रहिवाशी कासीम शेख हे पत्नी जहीदा (३६) व मुलगी अालिशा (५) यांच्यासह भूम शहरातील शिवशंकर नगर भागात दोन वर्षापासून किरायाने राहतात. दोघेही पती-पत्नी शहरातीलच भोळे यांच्या विटभट्टीवर मजुरी करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान, जाहिदा यांची आई दोन दिवसापूर्वी मुलीला व नातीला भेटण्यासाठी परंडा येथून भूममध्ये आली हाेती. बुधवारी सकाळी सगळ्यांच्या अंघोळी झाल्यावर जाहिदा यांनी कपडे धऊन नेहमीप्रमाणे घराच्या अंगणातील भिंतीला बांधलेल्या लोखंडी तारेवर कपडे वाळू घालत होत्या. याचवेळी त्यांना विजेचा जबर धक्का बसून त्या तारेला चिटकल्या गेल्या. मुलगी जाहीदा ही चिकटलेली पाहून त्यांच्या आई बानू वजीर पठाण (६५) या मदतीसाठी गेल्या. परंतु, त्यांना तांत्रिक ज्ञान नसल्याने त्यांनी थेट जाहीदा यांना पकडल्याने त्याही चिटकल्या गेल्या. याच गोंधळात अंगणात खेळत असलेली पाच वर्षाची आलिशाही खेळत आई व अाजीजवळ आली व तिलाही विजेचा जबर धक्का बसला. हा प्रकार शेजारील महिलांच्या लक्षात येताच त्यांनी परिसरातील इतरांना मदतीसाठी हाक देऊन लाकडाने सर्व वायर तोडून टाकले. यानंतर तिघींनाही शेजाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, जाहिदा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता तर पाच वर्षांच्या आलिशाची प्रकृती गंभीर असल्याने तिला बार्शी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. आजी बानू पठाण यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांच्यावर भूम येथेच उपचार सुरू आहेत. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या या कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. याबाबत भूम पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags :