उस्मानाबाद 0 Comments 201 Likes       26 Apr 2018

पत्नीला जाळल्याप्रकरणी पतीला जन्मठेप

उस्मानाबाद - शहरातील गालिब नगर येथे वर्षभरापूर्वी कॅरम खेळत असताना पत्नीने दोनवेळा हरविल्याच्या रागातून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयापुढे सुनावणी होऊन आरोपी पती जावेद दस्तगीर काझी यास जन्मठेप व ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली अाहे.

सेंट्रींग काम करणारा जावेद काझी व आस्मा यांचा २००८ मध्ये विवाह झाला असून त्यांना दोन मुले आहेत. ते गालीब नगर येथे वास्तव्यास होते. दि.३ मे च्या रात्री ११ वाजता आरोपी जावेद हा दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याने पत्नीला कॅरम खेळू म्हटल्याने दोघेही कॅरम खेळले. मात्र, यावेळी दोन्ही डावात पत्नीने हरविल्याने चिडलेल्या जावेदने अशा बायकांना जिवंत जाळून मारले पाहिजे असे म्हणाला. दरम्यान, त्यांच्या लहान मुलाने पाणी मागितल्याने आस्मा पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या. यावेळी पाठीमागून आलेल्या जावेदने बाटलीतील रॉकेल आस्माच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले होते. यावेळी शेजाऱ्यांनी आग विझवून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आनंदनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी बी. बी. चव्हाण यांनी उपचारादरम्यान आस्मा यांचा मृत्यूपूर्व जबाब घेतला. त्यानंतर दि.२ जून २०१७ रोजी आस्मा यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक तांबे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायाधीश -१ एसएएआर औटी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी पुरावे, साक्षी तसेच अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी मांडलेली बाजू विचारात घेऊन न्यायालयाने जावेद दस्तगीर (रा. मूळ नागोबाचीवाडी ता. बार्शी हल्ली उस्मानाबाद) याला जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास २ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम आरोपी व त्याची मृत पत्नी यांच्या दोन लहान मुलांना प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याचाही निर्णय दिला.

Tags :