उस्मानाबाद 0 Comments 401 Likes       23 May 2018

जिल्हा परिषदेची सभा पाच मिनिटात गुंडाळली

सत्ताधारी राष्ट्रवादी आजही जगतापच्या पाठीशी ?

उस्मानाबाद - विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या शिक्षणाधिकारी सचिन जगताप यास शासनाने परत बोलवावे, हा ठराव न घेताच दुसऱ्यावेळी बोलावण्यात आलेली सर्वसाधारण सभा पाच मिनिटात संपवली. अध्यक्ष नेताजी पाटील यांनी प्रस्ताव पाठवल्याचे कारण सांगून शिवसेनेची निलंबनाच्या ठरावाची मागणी धुडकावून लावली.

उस्मानाबाद  जिल्हा परिषदेची 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली सर्वसाधारण सभा  गणपूर्तीअभावी स्थगित करण्यात आली होती, ती आज 22 मे रोजी पुन्हा घेण्यात आली.

स्त्रीलंपट शिक्षणाधिकारी सचिन जगताप यास शासनाने परत बोलवावे, असा ठराव शिवसेना आणि काँग्रेसने आणला होता, पण काँग्रेस ऐनवेळी पंक्चर झाल्याने हा ठराव बारगळला होता. यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

आज झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे दत्ता साळुंके यांनी, आज तरी जगताप विरुद्ध ठराव पारीत करा असे सूचित केले असता, अध्यक्ष पाटील यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता ही मागणी फेटाळून लावली. अध्यक्ष  पाटील यांनी सांगितले की, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी, जगताप यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून, शासन काय निर्णय घ्यायचा तो घेवू द्या, आपण ठराव घेवून काय करणार ?असे म्हणून सभा अवघ्या पाच मिनिटांत गुंडाळली !

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे उपस्थित होते.

विशेष म्हणजे 10 एप्रिल रोजी जगतापवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता, त्याच्या दुसऱ्या  दिवशी सर्वसाधारण सभा असताना, ती स्थगित करण्यात आली होती आणि दीड महिन्याने पुन्हा सभा घेण्यात आली तर फरार शिक्षणाधिकारी जगताप आज पोलिसांना शरण आला आहे.

 

Tags :