उस्मानाबाद 0 Comments 1356 Likes       25 May 2018

पीडित महिलेचा कोण करतंय पाठलाग ?

उस्मानाबाद - स्त्रीलंपट शिक्षणाधिकारी सचिन जगताप याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्या पीडित महिलेचा दोघा दुचाकीस्वारांनी सतत दोन दिवस पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार  पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

 पीडित महिला बुधवारी (दि.२३ मे) सायंकाळी ६.३० ते ७ वाजेदरम्यान दुचाकीवरून शिवाजी चौकातून आयुर्वेदिक कॉलेजकडे जात होती. यावेळी दोघे अज्ञात इसम दुचाकीवरून  पाठलाग करत होते. थोड्या अंतरावर ते दोघे दुचाकीस्वार पीडित महिलेच्या जवळ आले व त्यांच्या दुचाकीवर थुंकले. यामुळे घाबरलेल्या महिलेने दुचाकीचा वेग वाढवून ओम नगरकडे दुचाकी वळवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी पीडित महिला दुचाकीवरून शहरात येण्यास निघाली असता पुन्हा तेच दोघे इसम १०.४५ वाजता आयुर्वेदिक कॉलेजजवळ थांबल्याचे दिसले. मला पाहताच त्या दोघांनी पुन्हा पाठलाग सुरू केला'. या घटनेबद्दल तक्रारदार महिलेने आनंदनगर पोलिस ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांना फोनवरून माहितीही दिली. तसेच याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनाही तक्रार दिली आहे. त्यामध्ये प्रकरणातील आरोपी सुभाष वीर व शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून जीविताला धोका असल्याचे तसेच बाहेर फिरणे, कार्यालयात जाणे मुश्किल झाल्याचे नमूद करून, याची दखल घ्यावी तसेच भविष्यात काही वाईट प्रकार घडल्यास सदरील दोघे जबाबदार असतील, असेही तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिलेला पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच सचिन जगताप यास जामीन देण्यात येवू नये अशी मागणी होत आहे.

 

Tags :