उस्मानाबाद 0 Comments 310 Likes       25 Mar 2017

दोन सावकारांच्या घरावर परंड्यात छापे

परंडा  - व्याजाने घेतलेल्या रकमेची परतफेड करूनही पैश्याची मागणी करून मानसिक त्रास देणाऱ्या परंडा शहरातील दोन सावकारांच्या घरावर सहकार विभागाने छापा मारून संशयास्पद व्यवहाराची कागदपत्रे जप्त केली आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. २२) परंडा शहरात करण्यात आली असून, याप्रकरणीचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आल्याने अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे.
तक्रारदार नारायण जाधव (रा.बार्शी) यांनी परंडा येथील सावकार संतोष लोखंडे बिभिषण शिंदे यांच्याकडून व्याजाने ५० हजार रुपये घेतले होते. ठरल्याप्रमाणे जाधव यांनी सावकाराकडून घेतलेल्या रकमेची परतफेड व्याजासह केली होती. मात्र हे दोन्ही सावकार जाधव यांना पैश्याची मागणी करून मानसिक त्रास देत असल्याने नारायण जाधव यांनी मुख्यमंत्र्याच्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार परंडा येथील सहायक निबंधक ए. टी. सय्यद भूमचे सहायक निबंधक ए. एस. गोगले यांच्या नेतृत्वाखाली दोन पथक स्थापन करून सहकार विभागाच्या १० कर्मचारी पोलिसांनी एकाच वेळी बुधवारी सकाळी १०.४५ वाजता सावकार संतोष लोखंडे बिभीषण शिंदे यांच्या परंडा येथील संगम पार्क परिसरातील घरावर जागेवरच नोटीस देऊन धाड टाकली. यावेळी पथकाला सावकारांच्या घरातून सावकारीची संशयास्पद कागदपत्रे सापडली. या पथकाने कागदपत्रे जप्त करून अहवाल सादर केला.

Tags :