मराठवाडा 0 Comments 383 Likes       31 Mar 2017

नांदेडला ‘नीट’परीक्षा केंद्र मंजूर

औरगाबाद- वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात ७ मे २०१७ रोजी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी केवळ औरंगाबाद हे एकच केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोईसाठी नांदेड व लातूर येथे देखील या परीक्षेचे केंद्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी १ मर्चा रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, ‘सीबीएसई’ बोर्ड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला यश आले असून ‘सीबीएसई’ बोर्डाने काल (दि.२८) पत्रक प्रसिध्द करून नांदेड जिल्ह्याला नीटचे परीक्षा केंद्र मंजूर केले आहे.

      शुक्रवारी (दि.२४) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘नीट’परीक्षेसाठी देशभरात नवीन २३ परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेतला. यात महाराष्ट्रातील अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर व सातारा या चार जिल्ह्यांचा समावेश होता. मात्र यात मराठवाड्याच्या वाट्याला एकही नवीन केंद्र देण्यात आलेले नव्हते. यासंदर्भात शनिवारी (दि.२५) आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना नांदेड व लातूर येथे ‘नीट’परीक्षेसाठी केंद्र देण्यात यावे यासाठी आपण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे शिफारस करण्याची विनंती केली होती. ‘नीट’परीक्षेसाठी मराठवाड्यात औरंगाबाद हे एकमेव केंद्र असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा ते औरंगाबाद अथवा नांदेड जिल्ह्यातील किनवट ते औरंगाबाद अंतर जवळपास ५०० किलोमीटर असून येथील विद्यार्थ्यांना हा प्रवास करून परीक्षा द्यावी लागणार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिले होते. तसेच विद्यार्थ्यांसोबत एक पालक व त्यांचा प्रवास, लॉजचा खर्च, परीक्षा शुल्क आदींचा विचार केला तर एका विद्यार्थ्याला जवळपास ८ ते १० हजारांचा आर्थिक भुर्दंड बसणार असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आपण स्वत: यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांकडे पाठपूरावा करणार असल्याचे सांगितले होते. तसेच आ.सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे देखील पुन्हा मागणी केली होती.

     आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला यश आले असून ‘सीबीएसई’ बोर्डाने मंगळवारी पत्रक प्रसिध्द करून नांदेड जिल्ह्याला नीटचे परीक्षा केंद्र मंजूर केले आहे. याबद्दल आ.सतीश चव्हाण यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे. आ.सतीश चव्हाण म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी नांदेड केंद्र हवे आहे अशांना ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. नांदेडला नीटचे परीक्षा केंद्र मंजूर झाल्याने नांदेड तसेच नजीकच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. लातूरला देखील नीटचे परीक्षा केंद्र द्यावे यासाठी आपण पाठपूरावा सुरूच ठेवणार असल्याचेही आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

Tags :