मराठवाडा 0 Comments 898 Likes       17 Apr 2017

चिंचोली माळीतील एकल महिला एकटीच उपसतेय कष्ट !

ज्यांचं हातावर पोट आहे; अशांना वाटतंय आपलं गाव पाणीदार व्हावं !

गौतम बचुटे/साळेगाव  -

केज तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या चिंचोली माळी येथे एकल महिला श्रीमती लता बरडे ही एकटीच श्रमदान करीत आहे. आणि माळेगाव येथील शितल भालेराव व वनमाला राऊत या दोघीनी महिलांचा श्रमदानात सहभाग वाढावा म्हणुन अभिनव शक्कल लढविली आहे. सांडपाण्याचा व वृक्ष लागवडीचा खड्डा खोडणाऱ्या महिलांचे त्या मोफत ब्लाउज शिवून देणार आहेत.

साळेगाव पासून जवळ असलेल्या चिंचोली माळी या गावात राहणारी  लता अच्युत बरडे ही एकल महिला. दररोज मोलमजुरी केल्याशिवाय घरात चुल पेटत नाही. अशा लता बरडे यांनी अंबाजोगाईच्या प्रशिक्षण केंद्रावर चार दिवसाचे वॉटर कप सर्धेचे प्रशिक्षण घेतले आणि आता माझे गाव पाणीदार करायचेच, पाण्याचा पडणारा प्रत्येक थेंब जिरवायचा आणि जलसंवर्धन, माती संवर्धना बरोबर वृक्ष लागवड करायचा हा संकल्प केला. त्यानी गावात येऊन लोकांनी श्रमदान करण्यासाठी लोकांना विनंती केली; पण प्रतिसाद मिळेना! कोणी मदत करण्यासाठी पुढे येत नसल्याचे पाहून दुःखी झाल्या; पण त्या खचल्या नाहीत. मग लता हिने कमरेला पदर खोचुन हातात टिकाव, फावडे आणि टोपले घेऊन कामाला लागली. दररोज सकाळी वस्तीवर रस्त्याच्या कडेला वृक्ष रोपण करण्यासाठीचे खड्डे खोदायला सुरुवात केली. आणि स्वतः घाम गाळून पाणी बचतीच्या कामात स्वतः राबत आहेत.

 

तसेच साळेगाव पासून जवळ असलेल्या माळेगाव येथील सौ. शितल भालेराव आणि श्रीमती वनमाला राऊत या दोघीं पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेऊन आल्या. नंतर त्यांनी गावात ग्रामसभा घेतली. महिलांना हळदी कुंकवाच्या माध्यमातून महिलांना एकत्र केले. आपण सगळ्याजणी मिळून गावासाठी काम करू. आपल्या एकीतून जलसंवर्धन करू. असे सांगितले. पण कोणीच ऐकेना. कोणी श्रमदान करण्यासाठी पुढे येईना! मग त्या दोघीनी असा निश्चय केला की, आपण दोघीनी मिळुन दररोज गावातील सांडपाण्याचे शोषखड्याचे खोदकाम करायचे आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. मात्र गाव मोठं असल्याने एवढं काम दोघीच्यानं कसं करणार? मग त्यांच्या लक्षात आलं की, या दोघी आपापल्या घरी शिवणकाम करून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. शिवणकामाच्या निमित्ताने महिलांचा संपर्क येतो. याचा याचा उपयोग आता पाणी फाउंडेशनच्या कामात करून घ्यायचा. यासाठी त्यांनी ही कल्पना आपल्या घरातील कर्त्या मंडळींना सांगितली. त्यांनी पण यास दुजोरा दिला. मग त्यांनी होर्डिंग बनवून आणले आणि ते गावातील मुख्य ठिकाणी व आपल्या घरासमोर लावले  आहे. त्यावर स्पष्ट लिहिले की, ज्या महिला आपल्या घरासमोर झाड लावण्यासाठी आणि सांडपाण्याचा शोषखड्डा खोदतील त्यांचे ब्लाउज आमच्या कडून मोफत शिवून दिले जाईल. त्याची शिलाई घेतली जाणार नाही. 

 

अशा प्रकारे या केज तालुक्यातील महिला माती अडवा आणि पाणी जिरवा व जलसंवर्धन करून पाण्याने गाव श्रीमंत बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावातील पुरुष स्वतःला कर्ते समजत असाल पण जर तुम्हाला पाण्याचे महत्त्व कळत नसेल तर तुम्ही पुरुष काय कामाचे! ज्यांना पाण्याचे महत्त्व कळत नाही ते बिनकामाचे !असा संदेश देत आहेत.                  

त्यांच्या या खारीच्या वाट्यात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाणी फाउंडेशनचे केज तालुका समन्वयक रविकर्ण इंगोले हे मार्गदर्शन करीत आहेत.

 

मी आता मागे हटणार नाही माझ्या एकटीच काम आज जरी छोटे वाटत असले तरी मला यश येईलच असा मला आत्मविश्वास वाटतोय.*

 --- लता बरडे, चिंचोलीमाळी

 

आम्हाला जरी पुरुष मंडळी सहकार्य करीत नसले तरी आम्ही आता महिलांना सोबत घेण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आमच्या सोबत येणाऱ्या भगिनींना आम्ही मोफत ब्लाउज शिवून देणार!*

--- सौ भालेराव व श्रीमती वनमाला राऊत, माळेगाव

 

Tags :
Related Video