मराठवाडा 0 Comments 622 Likes       10 May 2017

जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दगड-गोटे उचलतात

आधी केले मग सांगितले

गौतम बचुटे/साळेगाव

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "करणी करेगा; तो नर का नारायण बनेगा." तर फक्त लोकांना मार्गदर्शन आणि कृती शून्य असंण्या पेक्षा स्वतः केलेली कृती नेहमी उत्तम आणि प्रेरणा दायी असते. याचा प्रत्यय केज तालुक्यातील काशीदवाडी येथे आला.

केज तालुक्यातील काशीदवाडी गाव. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन गाव पाणीदार करायचंच या एकाच उद्देशाने झपाटलेलं गावातला जो-तो उठतोय अन झपाटल्या सारखा गावासाठी घाम गाळतोय, राबतोय. त्याचा ना मोबदला ना कुणाची सक्ती; पण सर्वांचे एकच ध्येय की, मला माझ्या गावात आणि शिवारात पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवायचाय. पाण्याचा अपव्यय टाळायचाय. हमखास पाचवीला पुजलेल्या दुष्काळाशी दोन हात करून तो तात्पुरता हटवायचा नाही; तर तो आता कायमचा पिटाळून लावायचाय. त्यासाठी रंक-राव, गरीब-श्रीमंत, छोटा-मोठा, स्त्री-पुरुष तरुण-तरुणी, लेकी-सुना, आजी-आजोबा, बालक-बालिका हे सर्वजण स्वयंस्फूर्तीने शिवारात राबत आहेत. त्यातुन गावची एकजुट आणि एकविचाराने माती   अडवून पाणी जिरवून दाखवायचं आहे. मग बघुयात दुष्काळ कसा

पासंगाला सुद्दा उभा राहतोय ते ! 

 

काशीदवाडीत राबत असलेले अनेकांचे हात असून गाव पाणीदार बनविण्याचा त्यांचा एकमेव उद्देश व स्तुत्य उपक्रम याची माहिती बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे आणि गटविकास अधिकारी उमेश नंदागवळी यांच्या कानावर गेली होती. अचानक एके दिवशी सकाळी गावकऱ्यांचे श्रमदानाचे काम सुरु असताना बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गावात येतात. गावकऱ्यांनी त्यांचेकडे लक्ष न देता काम करण्यावर लक्ष केंद्रित केलेले असते. मग मुख्यकार्यकारी अधिकारी सुद्दा आपले मोठेपण, पद आणि अधिकार विसरून एलबीएस (loose bolder structure) चा बंधारा तयार करण्यासाठी लागणारे दगड, गोटे उचलुन आणतात आणि कामात मदत करतात. या गडबडीत आणि अंगमेहनतीच्या कामाची सवय नसल्यामुळे ग्रामसेवक काकडे यांच्या हाताला दगड लागतो. हातातून रक्त वाहांते. त्या जखमेवर प्रथमोपचार करून मलमपट्टी झाल्यास काकडे पुन्हा न थांबता काम करतात. 

त्याच बरोबर केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेश नंदागवळी हे सुद्दा दिवसभराचे आपले सर्व कार्यालयीन काम उरकून रात्री आठ ते साडे आठ वाजता काशीदवाडीत येतात. सरपंच महादेव जाधवर यांची भेट घेऊन व उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधतात. रात्री सुमारे दीड वाजेपर्यंत स्वतः श्रमदान करतात. रात्री काशीदवाडीतच मुक्काम करतात. गावकऱ्यासोबत बेसन, भाकरी, ठेचा आणि लोणचे याचा आस्वाद घेतात. रात्री गावातच झोपतात. पुन्हा सकाळी सर्व विधी आटोपुन कामाला सुरुवात करतात. काशीदवाडीत सुरु असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत अशा प्रकारे अधिकारी आणि सर्व ग्रामस्थ योगदान देत असल्यामुळे सर्वांचा उत्साह दुणावला आहे. काशिदवाडीचा प्रत्येक नागरिक स्वतःला या कामात झोकून देत आहे. आता प्रत्येकजण माझ्या गावाला पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेचे बक्षीस मिळविण्यासाठी पेटून उठलाय. याचा आदर्श ईतर गावांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी घेतला तर जिल्ह्यातील अनेक गावे आदर्श आणि पाणीदार झाल्याशिवाय राहणार नाहीत.

Tags :