महाराष्ट्र 0 Comments 963 Likes       29 Sep 2017

उस्मानाबादचा तोतया ‘एसीबी अधिकारी अकोल्यात गजाआड

- डॉक्टरला दिली होती कारवाईची धमकी

अकोला -  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तोतया अधिकाऱ्याला सिव्हिल लाईन्स पोलिसांनी  गुरुवारी अटक केली. अच्युत सावंत असे  या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. हा तोतया उस्मानाबाद जिल्ह्यातील चिखली गावचा रहिवासी  आहे. अकोल्यातील ख्यातनाम डॉक्टर दांपत्यांना कारवाईची धमकी देत त्याने मोठी खंडणी मागितली होती. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मधुसूदन बगाडिया, रतनलाल प्लॉट, अकोला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अच्युत नंदू सावंत, (रा.चिखली,ता.जि. उस्मानाबाद) हा त्यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अधिकारी बनून आला. मी तुमच्या शेतातून २ कोटी रुपये जप्त केले असून, मला अधिक तपास करायचा आहे, असे त्याने डॉक्टरांना सांगितले. त्यावर डॉक्टरांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता त्याने दाखविलेल्या ओळखपत्रावर नाव नसल्याने डॉक्टरांना संशय आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला बोलण्यात गुंतविले. तोपर्यंत रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनचे ठाणेदार अन्वर शेख यांना मोबाईलवरुन याची माहिती दिली. अन्वर शेख यांनी त्वरित आपल्या पथकासह रुग्णालय गाठून संशयिताला ताब्यात घेतले. पोलिस स्टेशनला आणून त्याची कसून चौकशी केली असता आपण तोतया असल्याचे आरोपीने कबूल केले. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आज  शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर करुन पोलिस कोठडीची मागणी पोलिस करणार आहेत. सदरची कारवाई ठाणेदार अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संतोष आघव,गोसावी व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. 
 

Tags :