देश- विदेश 0 Comments 404 Likes       19 Mar 2017

सोनिया गांधी नामधारी अध्यक्ष; काँग्रेस राहुलच्या हाती: नायडू

हैदराबाद - केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्ष राहुल गांधी चालवत असून सोनिया गांधी या केवळ नामधारी अध्यक्ष असल्याची टीका नायडू यांनी केली आहे. पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बहुमत तर गोवा आणि मणिपूरमध्ये इतर पक्षांच्या सहकार्याने भाजपने सरकार स्थापन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना नायडू म्हणाले, "गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेच पक्ष चालवत आहेत. सोनिया गांधी या केवळ नामधारी अध्यक्षा आहेत. काँग्रेस ही एक बुडती जहाज आहे.' गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही काँग्रेस सरकार स्थापन करू शकले नाही. त्यानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनी पक्ष नेतृत्त्वावर शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, गोव्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यात अपयश आल्याने काँग्रेसचे माजी आमदार विश्‍वजित राणे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसचे महासचिव व गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हायला हवे, असा सल्ला दिला आहे.

Tags :