झलक 0 Comments 525 Likes       02 May 2018

खाकी नव्हे खा - की !

उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस तोडपाणी करण्यात अग्रेसर होते, यावर आज शिक्कामोर्तब झालंय. नवनाथ भोरे नामक एका पोलीस कॉन्स्टेबलने एका तक्रारदारास 30 हजार रुपयांची लाच मागितली, तडजोडीत 25 हजार ठरले, पैकी 10 हजार ऍडव्हान्स घेतले आणि उर्वरित 15 हजार एका खासगी एजंटामार्फत घेताना एसीबी पथकाने रंगेहात पकडून भोरे आणि खासगी दलाल बिरजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. भोरेने तक्रारदारास साहेबांना सांगून भादंवी 354 म्हणजे विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार नाही म्हणून लाच मागितली होती.
पोलीस कॉन्स्टेबल हा साहेबांना विचारल्याशिवाय इतकी मोठी 'डील' करणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे.
बरं ते जावू द्या, एखादी महिला पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची तक्रार देते, ती तक्रार तत्काळ नोंदवून घेण्याऐवजी 30 हजाराची लाच आरोपी असलेल्या इसमास मागण्यात येते, ही मोठी गंभीर बाब आहे.

आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध एका पीडित महिलेने विनयभंगाची तक्रार दिली असता ही तक्रार नोंदवण्यात आली नव्हती,त्यात मोठी 'डील' करण्यात आली होती, त्यानंतर माध्यमात बातम्या आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, त्याची शाई वाळते न वाळते तोच ग्रामीण पोलीस स्टेशनमधील हा प्रकार उघडकीस आला आहे.

ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि संभाजी पवार विरुद्ध मागे एका महिला कॉन्स्टेबलने गंभीर तक्रार केली होती, त्या प्रकरणात एसपीने पवारला पाठीशी घातले होते, आता या लाच प्रकरणात पवार यांचा संबंध नाही म्हणून पुन्हा पाठीशी घालणार, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

या लाचेसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून तक्रारदाराबरोबर बोलणी सुरू होती, लाच घेणारा कॉन्स्टेबल हा साहेबांचे नाव सांगून लाच घेत होता, या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्याची कुणकुण लागताच, साहेब 10 दिवस रजा टाकून आज निघून गेले, त्यांचा तात्पुरता पदभार नळदुर्गहून बदलून आलेले प्रल्हाद सूर्यवंशी यांनी घेताच, केवळ अर्धा तासाच्या फरकाने एसीबीची रेड झाली. साहेब बालंबाल बचावले असले तरी त्यांचा या प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, हे तपासण्याची गरज आहे.एसीबीचे अधिकारी कोणाचा मुलाहिजा न ठेवता ते तपासतील ही अपेक्षा आहे.

पवार उस्मानाबाद जिल्ह्यात येवून चार वर्षे झाली आहेत, उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक पद असताना, सपोनि असलेल्या पवारकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे, त्यांच्याविरुद्ध गंभीर तक्रारी असताना एसपी नेहमीच कानाडोळा करतात, याचा अर्थ नेमका काय काढावा ? या लाच प्रकरणानंतर तरी पवारवर कारवाई होणार का ? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे.

सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
9420477111

Tags :