उस्मानाबाद 0 Comments 393 Likes       10 May 2018

जि. प. अधिकाऱ्यांच्या इंग्रजी फलकांना मनसेने काळे फासले

उस्मानाबाद- राज्य शासनाने मराठीतूनच प्रशासकीय कारभार चालवण्यासाठी सक्तीचा आदेश काढलेला असतानांही जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांचे फलक हे इंग्रजी भाषेतच असल्याचा आक्षेप नोंदवत मनसेने जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी अधिकाऱ्यांच्या फलकांना काळे फासले.मनसेच्या या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत काही काळ तणाव निर्माण झाला होता.

राज्यातील शासकीय, निमशासकीय व महामंडळे यांच्या कार्यालयात बैठक, चर्चा, रजा, पत्रके, फायलींची नावे, टिपण्या, इतिवृत्त, नियम, अहवालांची कामे मराठीतच करावी असा राज्य सरकारचा आदेश आहे.

जे प्रशासकीय अधिकारी मराठी भाषेतून अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी मनसेकडून यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झालेत परंतू, आजही राज्यातील प्रशासकीय कार्यालयात इंग्रजीचा वापर केला जातो हे निषेधार्ह आहे. म्हणून यापुढे प्रशाकीय कार्यालयात मराठी व्यतिरिक्त इतर भाषेचा वापर झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे मनसे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी सांगितले.

Tags :