ताज्या बातम्या 0 Comments 161 Likes       29 May 2018

लोहाऱ्यात हरभरा विक्री रांगेत व्यापारी घुसले

अधिकाऱ्यांचा वरदहस्त !

लोहारा - उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे नाफेडच्या वतीने हमीभावावर हरभरा खरेदी केला जात आहे,त्यात काही व्यापारी घुसले असून, शेतकऱ्यांच्या नावावर ते स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहेत. त्यांच्यावर काही अधिकाऱ्यांचा वरदहस्त असून, दोघांच्या संगनमताने शासनाची लूट केली जात आहे.

लोहारा येथे हमीभाव खरेदी केंद्रावर तीन ते चार किलोमीटर रांग लागल्याची बातमी उस्मानाबाद लाइव्हने व्हिडीओसह प्रकाशित करताच, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील एक पथक हरभरा खरेदी केंद्रावर दाखल झाले आहेत.

इतकी रांग लागली कशी याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. मिळालेल्या माहितीनुसार या रांगेत अनेक दलाल व्यापारी घुसले आहेत.काही दलाल व्यापारी शेतकऱ्यांकडून बाहेर प्रतिक्लिंटल 2500 ते 2900 रुपये खरेदी करून ते शासनास 4400 रुपये विक्री करून नफा कमवत आहेत. ही हेराफेरी करताना काही डमी शेतकऱ्यांना उभे करण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांची परवड होत आहे.
खरेदी केंद्रावरील अधिकारी, कृषी अधिकारी यांच्या संगनमताने शासनास चुना लावला जात असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या पदरात शेवटी हरभरा

आधारभूत खरेदी केंद्रावर हरभरा खरेदीचा आज शेवटचा दिवस आहे, दलाल व्यापारी मध्ये घुसल्याने खरे शेतकरी बाजूला पडले आहेत.
हरभरा विक्रीसाठी गाडीभाड्याबरोबर प्रति क्लिंटल 100 रुपये कमिशन, 100 रुपये चाळणी आणि म्हणेल तेवढी हमाली द्यावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी नेमकी रक्कम राहते किती ? याचा ताळमेळ बसत नाही.

हरभरा खरेदीमध्ये दलाल व्यापारी आणि अधिकाऱ्यांचनी हात धुवून घेतले आहेत.

Tags :