ताज्या बातम्या 0 Comments 275 Likes       03 Jun 2018

आडत व्यापारी व शेतकरी दत्तात्रय गुंड यांची आत्महत्या

कळंब -  मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला सर्व व्यापारी व शेतकरी चोरच दिसतात. म्हणून तर तुम्ही त्या दोघांमध्ये भांडण  लावून दिलीत, तुमच्या सरकारी धोरणाने व दुष्काळाने कर्जाच्या खाईत बुडालेल्या अनेक शेतकऱ्यांपैकी मी एक शेतकरी. आजचा पहिला शेतकरी कायमचा संपावर गेला, आणखी किती जाणार, याची वाट पाहू नका, अशा आशयाची चिठ्ठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने लिहून कळंब तालुक्यातील निपाणी येथील आडत व्यापारी व तरुण शेतकरी दत्तात्रय गुंड  यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 ही घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. दत्तात्रय दादाराव गुंड (२९) यांचे मुरूड (ता. लातूर) येथे आडत दुकान असून, त्यांची निपाणी व शिराढोण शिवारात जमीन आहे. आडत व्यावसाय व शेतीसाठी घेतलेल्या कर्जामुळे ते नैराश्यात होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतात चिंचाच्या झाडास गळफास घेवून आपली जिवनयात्रा संपवल्याची चर्चा आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ठेवून त्यात त्यांनी व्यथा मांडली आहे. चिठ्ठीत त्यांनी शासनाच्या व्यापारी व शेतकऱ्यांच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करीत निर्णय बदला, शेतकरी वाचवा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली अाहे. दत्तात्रय गुंड यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

काय लिहिले आहे, चिठ्ठीत ?

मा मुख्यमंत्री साहेब तुम्ही केलेल्या कामगिरी बद्दल धन्यवाद ..

तुम्हाला सर्व व्यापारी व शेतकरी चोरच दिसतात म्हणून तर तुम्ही त्या दोघात भांडणे लावून दिलीत व पाहत बसलात . आतापर्यंत व्यापाऱ्यांनीच त्यांना तारल म्हणून तर शेतकरी जिवंत होता

हमीभाव , कर्जमाफी , फुकट बियाणे , शेततळे विहिरी अशा अफवानी तर त्यांना पुरते कर्जाच्या डोंगरात बुडाले त्यातील मी एक शेतकरी , नुकतच जीवन चालू केले होते तुमच्याच सरकारी धोरणाने व दुष्काळाने संपविले .

आजचा पहिला शेतकरी संपावर गेला , आणखीन किती जाणार याची वाट नका पाहू , निर्णय बदला शेतकरी व व्यापारी जगवा

घरच्या सर्वांची हात जोडून माफी मागतो लहान आरोही पासून बापू पर्यंत

मी जे केले याला सर्वस्वी माझी चूक आहे मला माफ करा माझ्या लेकरांना दूर करू नका , त्यांना तुमच्यापाशीच ठेवा . उर्मिला तुही इथेच रहा , शेवटची माफी मागतो

खासगी कर्ज व त्यांच्या व्याजाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे माझ्या घरच्याला त्रास करू नये

दत्तात्रय गुंड , 32 वर्षीय शेतकरी

 

 

Tags :