मुख्य बातमी 0 Comments 4159 Likes       12 Jun 2018

भाजपाचे सुरेश धस विजयी

उस्मानाबाद - विधान परिषदेच्या उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे सुरेश धस  ७४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा सनसनाटी पराभव केला.

भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 526 मतं तर  राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना 452 मतं मिळाली. नोटाला एक मत, तर 25 मतं बाद ठरली. सांकेतिक आकडे लिहिलेले असल्यानं 25 मतं  बाद करण्यात आली.

सुरेश धस विजयी होताच भाजपच्या कर्यकर्त्यानी  बुलडोझर मधून गुलालाची मुक्त उधळण केली. त्यानंतर धस यांची खांद्यावर घेवून  विजयी मिरवणूक काढण्यात आली.‘बेटा बेटा होता है और बाप बाप’, असा टोला सुरेश धस यांनी  धनंजय मुंडेंला लगावला आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे वर्चस्व असताना राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मते फुटल्याचे उघड आहे. कोणत्या नेत्याने जगदाळे यांच्या पाठीत खंजीर खुपसला याची चर्चा आता रंगू लागली आहे.

धस यांचा विजय भाजपाच्या नेत्या आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांची सरशी  तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जातो आहे. राष्ट्रवादीच्या उस्मानाबादच्या नेत्याने आणि तुळजापूरच्या काँग्रेस नेत्याने जगदाळे यांचा विश्वासघात केल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत घोडाबाजार होवूनही  कोण कुणाला घोडा लावला याची चर्चा आता रंगू लागली आहे.

बाद मते  ठरवण्यावरून सुरेश धस आणि अशोक जगदाळे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली, त्यावरून काही काळ मतमोजणी थांबली होती. त्यामुळे अधिकृत निकाल लागण्यास बराच वेळ लागला. या निवडणुकीची फेरमतमोजणी करावी, अशी मागणी अशोक जगदाळे यांनी केली आहे

विधान परिषदेच्या उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक २१ मे रोजी झाली तर २४ मे रोजी निकाल लागणे अपेक्षित होते, मात्र बीडचे १० अपात्र सदस्य न्यायालयात गेल्याने मतमोजणी लांबली होती.

 

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी, ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीने अपक्ष अशोक जगदाळे यांना पुरस्कृत केले होते. मात्र राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी जगदाळे यांचा विश्वासघात केला. आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये ही धारणा पक्षाच्या काही नेत्यांची आहे.

 

काय म्हणाले सुरेश धस ?

विधानपरिषद निवडणुकीतील विजय हा धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय आहे. ‘बेटा बेटा होता है और बाप बाप’ असं म्हणत भाजपचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. स्मार्टवॉच, किचन, आयफोन वाटूनही राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेला उमेदवार पराभूत झाला. त्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरला. मात्र तरीही काही उपयोग झाला नाही. इथून पुढे राष्ट्रवादीने घड्याळऐवजी किचन, स्मार्टवॉच, आयफोन, कॅमेरा हे चिन्हं घ्यावं, असं सुरेश धस म्हणाले. या निवडणुकीत कोणाकोणाची मदत झाली, असं विचारलं असता धस म्हणाले, मी भाजपचा उमेदवार आहे. मला सर्वांची मदत झाली. घड्याळ घातलेल्या हातांनी मला मदत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने गोरगरिब नगरसेवक, झेडपी सदस्य, पंचायत समिती सभापतींवर नजर ठेवण्याऐवजी तुमच्या पक्षात तोडपाणी कोण करतात, त्यांच्यावर कॅमेरे लावले तर फार बरं होईल, असा टोलाही सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना लगावला.तसंच मी धनंजय मुंडेंबाबत काही बोलणार नाही. मी कुठेही त्यांचं नाव घेतलं नाही. बाप बाप हौत है बेटा बेटा होता है, असंही सुरेश धस म्हणाले. काँग्रेसने आघाडीचा धर्मा पाळला नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते, पण राष्ट्रवादीला काँग्रेसबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे?

तुमची नवरी मंडपातून पळून गेली, तुम्ही दुसरी आणली, पण ती नवरी आणताना तरी कोणाला विचारलं होतं का हे मला माहित नाही, असं टोमणा धस यांनी लगावला.

 

Tags :