मुख्य बातमी 0 Comments 1293 Likes       15 Jun 2018

पवनराजे खून खटल्यात अण्णा हजारे साक्षीदार होणार का ?

आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांचा अर्ज दाखल

मुंबई - उस्मानाबादचे काँग्रेस नेते आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चुलत बंधू पवन राजेनिंबाळकर यांची हत्या होवून १२ वर्षे झाली तरी अजून या खून खटल्याचा अजून निकाल लागलेला नाही या  खटल्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना फिर्यादी पक्षाचा साक्षीदार करण्यात येवून त्यांचा जबाब नोंदवण्यात यावा, अशी विनंती करणारा अर्ज राजेनिंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी  आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. आनंदीदेवी यांनी हा अर्ज दाखल करताच या प्रकरणाचा तपास करणाऱया सीबीआयनेदेखील मुंबई सत्र न्यायालयात एक अर्ज दाखल करून हजारे यांचे नाव या खटल्यात फिर्यादी पक्षाचा साक्षीदार म्हणून समाविष्ट करण्याची परवानगी मागितली.

निंबाळकर यांच्या हत्येचे आरोप असलेले माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी हजारे यांनाही धमकी दिली होती. त्यामुळे या खटल्यात हजारे हे मुख्य साक्षीदार ठरू शकतात, असे सीबीआयचे म्हणणे आहे. निंबाळकर खून खटल्यात मिळालेल्या या नाटय़मय वळणामुळे न्यायमूर्ती नाईक यांनी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणाच्या खटल्याला तूर्त जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण आपण येत्या २७ जून रोजी सुनावणीस घेऊ, असेही न्यायमूर्ती म्हणाले.

यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी याप्रकरणील आरोपींचा जबाब पुढील सुनावणीपर्यंत नोंदवू नये, असे आदेश सत्र न्यायालयाला दिले असून दोन आठवड्यांकरिता याबाबतची सुनावणी तहकूब केली.

काय आहे प्रकरण?
राजकीय वैमानस्यातून काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची 2006 साली नवी मुंबईतील कळंबोली येथे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सात जणांना अटक केली होती.

पद्मसिंह पाटील हे सध्या जामिनावर बाहेर असून या प्रकरणी सत्र न्यायालयात खटलाही अद्याप सुरु आहे. या हत्येमागे नेमके प्रमुख कारण काय असू शकते याचा उलगडा अण्णा हजारे करू शकतात, असा दावा सीबीआयनेही केला आहे.

 

 

 

 

 

Tags :