मुख्य बातमी 0 Comments 220 Likes       24 Jun 2018

तुळजापूरच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना गंगणे अपात्र

जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचा दणका

तुळजापूर - तुळजापूर यात्रा अनुदान  आणि घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या नगराध्यक्षा सौ. अर्चना गंगणे यांना जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी अपात्र ठरवल्याने राजकीय गोटात भूकंप झाला आहे.

तुळजापूरात 1 कोटी 62 लाखाचा  यात्रा अनुदान  घोटाळा आणि 25 कोटींचा घरकुल घोटाळा उघडकीस आल्यानंतर मार्च 2017 मध्ये  नगराध्यक्षा सौ अर्चना गंगणे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 208 दिवस म्हणजे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ त्या फरार होत्या.

सौ. गंगणे यांनी या काळात रजेचा अर्ज दाखल करणे महत्वाचे होते, तसेच त्यांचा अर्ज विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर होणे आवश्यक असताना, गंगणे आणि त्यांचे समर्थक नगरसेवक गाफील राहिले. तीन महिन्यापेक्षा अधिक काळ विनापरवाना रजेवर गेले  तर त्या पदावरून  पायउतार व्हावे लागते.

हाच मुद्दा पकडून तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांनी, जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करून गंगणे यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती, त्यावर सुनावणी होवून  जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे  यांनी, सौ अर्चना गंगणे यांना नगराध्यक्ष पदावर राहणे अपात्र ठरवले आहे, त्यामुळे  राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

या  प्रकरणी राजाभाऊ माने यांनी जिल्हाधिकारी यांचा निर्णय योग्य असल्याचे सांगत आनंद व्यक्त केलाय.

Tags :