ताज्या बातम्या 0 Comments 123 Likes       14 Aug 2018

धनगर आरक्षणासाठी अणदूर येथे कडकडीत बंद

अणदूर - धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. १३) अणदूर (ता. तुळजापूर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. धनगर समाजाच्या वतीने गावातून शासनाच्या विरोधात निषेध फेरीही काढण्यात आली. 

गावातून निषेध फेरी काढून ठिसका मारुती मंदिरासमोर निषेध सभा घेण्यात आली. निवडणुकीपुर्वी दिलेले आश्वासन भारतीय जनता पक्ष सरकारने पाळले नाही. सरकारने खोटी आश्वासने देऊन समाजाची फसवणूक केली आहे. चार वर्षे झाली तरी आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही, असा आरोप अखिल भारतीय धनगर महासंघाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश घोडके यांनी सभेत बोलताना केला. आता आरक्षणासाठी आर या पारची लढाई आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाने अहिंसक व राष्ट्रीय संपत्तीचे कोणतेही नुकसान न करता आंदोलन करावे. यासाठी तुळजापूर ते चौंडी दरम्यान निघणाऱ्या पदयात्रेत व औरंगाबाद येथील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. घोडके यांनी केले.

अखिल भारतीय धनगर महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला अणदूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गावातील व्यापाऱ्यांनी सोमवारी आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. आनंद घोडके यांनी आभार मानले. यावेळी अरविंद घोडके, अशोक घोडके, विलास एडके, नागनाथ भालकरे, नागनाथ घोडके, प्रभाकर वाघे, बिरु सोनटक्के, काशीनाथ घोडके, मारुती गळाकाटे, म्हाळप्पा घोडके, रमेश घोडके, दत्ता मातोळकर, भालचंद्र चेंडके यांच्यासह समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags :